क्लेशकारक अनुभव गांधिवधानंतरचा | Life of Chitpavan Kokanastha Brahmins After Killing of Mahatma Gandhi By Subhash Apte

Complete Monologue by Subhash Apte in Marathi:

१९४८ साली गांधींचा वध झाला तेंव्हा मी आठ वर्षांचा होतो. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठलो तर सगळे वरचे लोक ओरडत होते. पेपर मध्ये आले आहे महात्मा गांधींचा खून झाला आणि मारेकरी पळून गेले अशी बातमी पेपर मध्ये आली होती आणि त्यात एक उल्लेख होता की मारेकऱ्यामध्ये गोडसे व आपटे आहेत. मी काही पेपर वाचला नव्हता परंतु वरती पटेल म्हणून राहत होते त्यांचा मुलगा होता त्याचे नाव आठवत नाही मी बाहेर आल्यावर ते म्हणाले, “गांधीजींचा मारेकरी आला, गांधीजींचा मारेकरी आला”. मी म्हणालो, “काय केले रे मी बाबा तुझे?”. अरे तुम्हारे चाचाने मारा है उसको! गांधी को मारा! पण मला काहीच कळले नाही. मी परत घरात आलो आणि वडिलांना विचारलं हे कसे का मला चिडवताहेत? ते म्हणाले, तू बाहेर कोणाशीही काही बोलू नकोस. पण तो बाहेरून मोठ्याने बोलत होता, “वह मारनेवाला चालमे रहाताहै आपटे!” पण आम्ही कोणीच त्याला प्रतिसाद दिला नाही. दुर्लक्ष केलं. थोड्या वेळाने तो शांत झाला. त्याने बोलायचे बंद केले. नंतर माझ्या वडिलांनी पेपर वाचला आणि सांगितले, “गांधीजींचा खून झाला आहे. आपटे आणि गोडसे यांनी खून केला आहे. आपलं आडनाव साधर्म्य आहे त्यामुळे आपल्याला ते लोक म्हणत आहेत. तू कोणाकडे लक्ष देऊ नको”. असा सर्वाना सांगितलं. त्या दिवशी आम्ही कोणी शाळेत गेलो नाही. आम्ही आपला घरातच होतो.

माझे वडील आरे मिल्क कॉलनीत जनरल मॅनेजर होते गोरेगावला. त्यावेळी आम्ही पार्ल्यात राहत होतो आणि मी पार्ले टिळक विद्यालयात शिकत होतो. माझा मोठा भाऊ आणि धाकटी बहीण याच शाळेत शिकत होते. माझी आई सुद्धा याच शाळेत शिकत होती. ती मॅट्रिकला होती. दुसऱ्या दिवशी माझे तीन आतेभाऊ – लक्ष्मण मराठे, बापू मराठे आणि राम मराठे यांना पोलीस पकडून घेऊन गेले. नंतर वडील घरी आले ते म्हणाले मला नोकरीचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. म्हणून मी घरी आलो आहे. त्यावेळेस राजीनामा काय? ते काही कळलं नव्हते. नंतर काही वेळानी आईने सांगितले की वडिलांची नोकरी गेली आहे, तेंव्हा तुम्ही जास्त खर्च करू नका. काही मागू नका. ठीक आहे. आम्ही म्हणालो आम्ही मागणार नाही. नंतर एक पत्र आलं की सांगलीला डीग्रज येथे आमचा मोठा वाडा होता तिथे जाळपोळ झाली आहे, तोडफोड झाली आहे तर तुम्ही येऊन बघून जा. माझे वडील आणि माझे काका तिकडे गेले. थोडे दिवसांनी ते परत आले तेंव्हा कळले कि आमचा संपूर्ण वाडा उध्वस्त केला आहे. वाडा जमीनदोस्त झाला आहे. काहीही शिल्लक नाही. दुसरा वाडा होता तो ग्रामपंचायतीला दिलेला होता त्या कारणाने त्या वाड्याचे काही नुकसान झाले नव्हते. ग्रामपंचायत तो वाडा वापरात होती. आज सुद्धा तो वाडा जशाचातसा डीग्रज मध्ये आहे. माझे वडील जेंव्हा परत आले आणि ती घटना कथन केली तेंव्हा ऐकून मी अगदी रडावेला झालो होतो. वडील म्हणाले सुभाष आता डीग्रज मध्ये आपले काही शिल्लक राहिलेल नाही. आपली जामीन पण आता जाणार आहे. आपला जे काही आता आहे त्यातच आपण चालू ठेवायचे आहे. वडिलांची तर नोकरी पण गेली होती. मग वडिलांनी दुधाचा व्यवसाय सुरु केला कारण ते स्वतः त्यातले जाणकार होते. त्याशिवाय आरेच्या बाटल्या घेऊन घरोघर पोहचवायला सुरुवात केली. आम्ही दोघे भाऊ पण मदत करायचो. सायकलने रोज घरोघर जाऊन बाटल्या पोहचवायचो. वयाच्या आठव्या वर्षी हे काम सुरु केले.

नंतर मला मामाकडे राहायला पाठवले पुण्याला. तर मामाच्या घरी माझ्या लक्षात आलं कि ब्राह्मणाचे नाव घ्यायचे नाही, आडनाव सांगायचे नाही, फक्त सुभाष सांगायचे. जात विचारली तर हिंदू असेच सांगायचे. मी मामला विचारले, मामा असे का? गांधी तिकडे मेल्यामुळे हे सगळं झालाय का? हो सर्वानाच हा त्रास झाला आहे. पण आपण ह्या विषयावर जास्त काही बोलायचे नाही. मग मामाने मला सांगितले कि सांगलीत आता काही शिल्लक राहिले नाही. आपले वाडे जाळून टाकले आहेत. आपल्या जमिनी जाणार आहेत. त्याचवेळी कसेल त्याची जमीन हा कायदा सुरु केला. कुळकायदा सुरु केला. ब्राह्मणांच्या विरुद्धच हा कायदा होता. त्या काळात ब्राह्मणच मालक होते जमिनीचे. बाकी सर्व कुळवाडी शेतात काम करायचे. माझे वडील पुन्हा एकदा सांगलीला गेले. जमिनीच्या संधर्भात त्यावेळी आमचं कुळ होतं, तुकाराम नलावडे कोर्टात गेला होता. आम्ही ही जमीन कसतोय तर तो आमच्या नवे करा. आम्ही वकील दिला त्याचे नाव माईणकर पण आमच्या लक्षात आलं की माईणकर प्रत्येक वेळी काहीनाकाही बहाणे करायचा आणि शेवटी ती केस आमच्या हातून गेली. आमची संपूर्ण ८० एकर जमीन गेली. आमचं एक विठ्ठल मंदिर होते चावडीच्या समोर ते राहिले होते व देवळाच्या सभोवतालची १५ एकर जमीन तेवढीच आमच्या ताब्यात होती पण हे तुकारामाच्या लक्षात आल्यावर त्याने पुन्हा केस केली. ती केस बरेच वर्ष चालली आणि शेवटी निकाल त्यांच्याबाजूनेच लागला आणि ती जमीन आम्हाला द्यावी लागली आणि आमचे देऊळ पण हातचे गेले.

त्या काळात आमची फार वाईट अवस्था होती. वडिलांचा धंदा तसा फारसा काही चालत नव्हता. आई मॅट्रिक नुकतीच झाली होती आणि शिक्षिका होण्यासाठी एस. टी. सी. शिकत होती. आमच्या वडिलांच्या लक्षात आलं की मुंबईत राहणं फार कठीण आहे. त्यावेळी वडिलांना नोकरीचा कॉल आला होता. कोल्हापूरला ‘दूध उत्पादक संघ’ म्हणून संस्था निर्माण करायची होती. माझे वडील तेथे गेले आणि त्यांनी ती संस्था सुरु केली. त्या काळात तिथल्या लोकांना पाश्चरायझेशन चे एक छोटे मशीन बनवले आणि उकळलेले गरम दूध त्या मशीनवर हाताने ओतायचे मग गार झालेले दूध जमा करायचे. फ्रिज मध्ये ठेवायचे. असे दूध सात दिवस टिकू शकते. त्या काळात वडिलांनी हे पाश्चरायझेशन सुरु केले आणि नंतर आम्हीपण तेथे कोल्हापूरला राहायला गेलो. ही गोष्ट आहे १९५१ सालची. मोहिते यांच्या घरात आम्ही राहायला लागलो. पण आजूबाजूची माणसे काही चांगली नव्हती. देसाई म्हणून जे होते त्यांचे तेथे खूप प्रस्थ होते. देसाईंचा एक मुलगा होता तो आपण ‘स्वामी’ आहोत असचं दाखवायचा. आम्ही शाळेत चाललो की ‘बामण चालला, बामण चालला’, असं चिडवायचे पण कधी हल्ला केला नाही. सतत शिविगाळ करायचे. वडिलांनी सांगितले होते हे असेच आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे, काही ऐकलंच नाही असा दाखवायचं. अशा प्रकारे तो अत्त्यंत वाईट काळ गेला. वडलांनापण त्या नोकरी मध्ये खूप जाच झाला. १९५५ साली ती नोकरी गेली.

कर्मधर्म संयोगाने १९६५ मध्ये मी नेव्हीत भरती झालो आणि कुटुंबावरचे थोडे ओझे कमी केले. त्या दरम्यानच आईलापण सांगलीला पटवर्धन शिक्षण संस्थेत नोकरी मिळाली अशी कुटुंबाची व्यथा थोडी कमी होऊ लागली. माझा भाऊ तेंव्हा कॉलेजला होता. मी नेव्हीत गेलो आणि माझी बहीण नर्सिंगला गेली. मग माझे वडील आणि कुटुंब सांगलीला गेले. माझे वडील आय. डी. बी. मधले गोल्ड मेडालिस्ट होते. ते भारतातले पहिले गोल्ड मेडालिस्ट होते तरी सुद्धा त्यांना नोकरी मिळत नव्हती. मला जो नेव्हीत तुटपुंजा पगार मिळायचा तो सर्व घरी पाठवत असे. माझी बहीणही तिला मिळणारा जो काही थोडा पगार होता तो घरी पाठवायची. मी तर क्रित्येक वर्षे घरी पैसे पाठवत होतो. लग्नझाल्यावर सुद्धा मी घरी पैसे पाठवत होतो. मी इंग्लड ला गेलो होतो तेथे आईने पत्र पाठवले होते. वैद्यकीय शिक्षणासाठी भावाला पैशांची गरज आहे. त्यावेळी कॅप्टन नाडकर्णी होते त्यांना मी पत्र दाखवले. त्यांनी लगेच मला २० पौंड दिले. आणि सांगलीला आमच्या घरी पाठवले. नंतर दोन महिन्यात मी त्यांना ते पैसे परत केले. मला रोज एक पौंड पगार मिळत होता.

आता आमच्या घराची दुर्दशा संपत आली होती. माझा बऱ्यापैकी पगार वाढला होता. नंतर मी मुंबईला आलो. तेंव्हा आमची परिस्थिती चांगलीच सुधारली होती. माझा भाऊ पण डॉक्टर झाला होता. तो त्याच्या पायावर उभा राहीला होता. नंतर त्याने लग्न केले. माझे लग्न १९६६ साली झाले. त्यावेळी मी नेव्हीतून बाहेर पडायचा विचार करत होतो. पण मला कमांडरनी रशियाला जाण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांनी सांगितले आत्ताच्या आत्ता अर्ज कर. मी त्यांना सांगितले, मला नेव्हीत राहायचे नाही मी रिटायर होणार आहे पण त्यांनी माझ्या समोर चांगलं चित्र रंगवलं म्हणून मी रशियाला जायला तयार झालो. पण मला वाटत होतो कि मी मेडिकल ला अनफिट होईन पण अर्ज केल्यानंतर तिसऱ्याच दिवशी वैद्यकीय तपासणी साठी मला कोचिनला पाठवलं. तेथे मी बऱ्याच परीक्षा दिल्या. परीक्षा देता देता एक आठवडा गेला. त्यांनी मला रिझल्ट सांगितला नाही. मी मुंबईला परत आलो. मला वाटले बहुतेक मी नापास झालो. मी सुट्टी घेऊन सांगलीला गेलो. माझ्या बहिणीने तिच्या मैत्रिणीचे स्थळ सुचवले. माझे लग्न जमले. नेव्हीत मला सिलेकशन मिळाले. मी डिड वर्षाच्या कोर्स साठी रवानां झालो.

नंतर माझा मोठा भाऊ मधुकर आपटे याने आपल्या गावाला डिग्रजला दवाखाना सुरूकेला. त्या काळात मी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सांगलीला सुरु केला. १९७६ सालची हि गोष्ट. सांगलीहून मी मधून मधून डिग्रजला भावाकडे जायचो तेंव्हा देऊळ आमच्या ताब्यात होते. तेथे आंम्हाला मान होता. एकदा मी भावाकडे गेलो तेंव्हा एक माणूस दुसऱ्याएका माणसाला बरोबर घेऊन आला. आणि म्हणाला यांच माणसाने तुमचा वाद लुटला. तो माणूस भावाच्या पाया पडला. आणि म्हणाला मी त्यावेळी त्यात होतो. तो जैन समाजातला होता. पण भावाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मग तो निघून गेला.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *