
आमचे मूळ गाव लिंब सातारा जिल्हा तेच गाव गजानन मिलचे मालक वेलणकर यांचे. त्यांनी लिंब वर एक पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या पुस्तकात १०० वर्षापूर्वीचे लिंब हे भरभराटीचे असावे असे दिसते. १९४८ साली ज्या दिवशी लिंब मध्ये जाळपोळ झाली त्या दिवशी आमच्या लक्ष्मी नारायण मंदिरात पूजा करणारे नरहर दत्तात्रय बर्वे हे लहान होते आणि त्यांच्या घरात हळदीकुंकू असल्याने ५० -६० ब्राह्मणां च्या सुवासिनी आलेल्या होत्या, त्यावेळी त्यांचा मुलगा फिरत फिरत पारावर गेला त्यावेळी गावातील काही ब्राह्मण द्वेषी मंडळी जमली होती आणि कोल्हापुराहून आपल्याला सांगावा आला आहे की ब्राह्मणांचि घरे पेटवायची ते ऐकून तो मुलगा धावत आला व त्याने आईला ती बातमी सांगितली. पण त्या बायकांनी तुला काय कळते म्हणून दुर्लक्ष केले आणि तासाभरात बर्व्यांसह १०० ब्राह्मणाची घरे जळून खाक झाली त्यात सरदार आपट्यां चा प्रचंड मोठा वाडा पण जळाला त्यावेळी बर्वे व अभ्यंकर अशी दोन कुटुंबे सोडून बाकी सर्व सातारला पळून गेले. बर्वे यांच्या वाड्याशेजारी विष्णूचे देऊळ आहे ते सुरक्षित राहिल्याने त्याच्या भिंतीला पत्रे लावून बर्व्यांनी आडोसा केला तो अजून तसाच आहे. आपट्यांच्या विष्णू मंदिराला सांगली जिह्यातील सागाव येथे जमीन आहे. तिथे कुलकर्ण्यांचा वाडा आहे, ते कुलकर्णी संघाची शाखा चालवत म्हणून गुंडांनी त्यांचा पाठलाग केला आणि फरशी कुऱ्हाडीने त्यांच्यावर प्राणघातक वार केले. ते जेंव्हा जमिनीवर कोसळले तेंव्हा हा खरच मेला आहे का याची खात्री करण्यासाठी त्यांनी त्यांचा उजवा अंगठा तोडला तरी त्यांनी हूं की चूं केले नाही त्यानंतर ते कसेतरी चालत चालत कोल्हापूरला पोहचले. त्यानंतर एकदा साताऱ्यात संघाची बैठक जिल्हा कार्यवाह अण्णा भोई हे 63 साली घेत होते त्यावेळी संघाच्या स्वयं सेवकांनी त्याग केला पाहिजे असे ते म्हणाले त्यावेळी त्या कुलकर्णींनी तुटका अंगठा दाखवून आणखी काय त्याग करायचा असा प्रश्न विचारला त्यावेळी सर्वजण स्थब्ध झाले. पुढच्याच वर्षी कऱ्हाड जवळील कोले या गावी शाखा चालविणाऱ्या अण्णा भोईंचा संघ कार्यकर्ते म्हणून निर्घृण खून झाला.
आमचे पूर्वज लिंबहून किर्लोस्कर वाडीजवळीलल आमणापूर येथे वाडा बांधून राहिले. आमचे वडील किर्लोस्कर वाडीत शाळेत शिक्षक असल्याने आम्हाला सिमेंटच्या चाळीत घर होते. आमचे चुलते आमणापूरच्या वाड्यात राहत असत १९४८ साली वाद पेटवल्यावर आमच्या चुलत्याला दोरांनी बांधून त्यांचे मुटकुळे केले होते पण त्यांना उचलून पेटत्या वाड्यात फेकण्याचे धारिष्ट्य कोणाला न झाल्याने ते २४ तास तिथेच पडून होते. नंतर त्यांना कोणीतरी मोकळे केले. आपटे वाड्याचा रस्त्याकडील एक कोपरा शाबूत का राहिला त्याचे रहस्य असे ते गुंड वाडा पेटवत असतांना एकजण दुसऱ्याला म्हणाला हा कोपरा पेटवायला नको कारण तो आपल्या आपटे गुरुजींच्या वाटणीचा आहे. म्हणजे ही काळ्या ढगाला चंदेरी किनार. त्या जाळपोळीवर आमच्या आईने एक कवन केले होते त्यातील आठवणीतल्या चार ओळी अशा –
‘वैभव गेले जिकडे तिकडे ढीग साचले मातीचे,
भूमातेच्या उदरी जन्मूनी वैर माजले जातीचे’.
आता शेवटचा प्रसंग किर्लोस्कर वाडीचा. संपूर्ण वाडीला काटेरी तारेचे कुंपण होते. आणि त्या कुंपणाच्या पलीकडून शेकडो गुंड आरोळ्या देत फिरत होते आम्ही घरात जीव मुठीत धरून बसलो होतो. आमच्या आईने आमच्या गणवेषातील पट्टा टोपी इत्यादी साहित्य चिंचेच्या टोपलीत लपविले होते. ज्यावेळी तो मोर्चा गेट पाशी आला त्यावेळी शंकरराव किर्लोस्करांनी त्यांच्या पुढाऱ्यांशी वाटाघाटी केल्या ते असे म्हणाले तुम्ही किर्लोस्कर वाडी पेटवली तर मी पुण्याला निघून जाईन व कारखान्यात नोकरी करून पगार मिळवणारे शेकडो कामगार बेकार होतील त्याचा तुम्ही विचार करा.नंतर त्यांनी संघाच्या तरुणांना आमच्या ताब्यात द्या असा हेका लावला, त्यावर शंकरराव असे म्हणाले की मी ही तरुण मुले गोळा करतो आणि त्यांना आगगाडीत बसवून देतो पुढे काय ते तुम्ही पहा. शंकररावांनी संघातले तरुण गोळा करून त्यांना रात्री दोनच्या गाडीत हरिहर किर्लोस्कर कारखान्याकडे पाठवून दिले. तोपर्यंत बहुतेक गुंड वाट पाहून झोपले होते त्या तरुणांमध्ये आमचा शाखेतील शिक्षक श्रीकांत मोघे हाही होता, काही गुंड त्यांच्या डब्यात शिरले व त्यांच्याशी त्यांनी मारामारी केली. श्रीकांत मोघे यांचे वडील राम गणेश मोघे हे घरातच कीर्तन करीत असत कीर्तन चालू असतांना एकाने त्यांच्या कानात गांधी वधाची बातमी सांगितली त्यावर किर्तन तिथेच थांबवून त्यांनी भजन सुरु केले ते टाळी वाजवून खूण करीत व सर्वजण भजन म्हणत त्या गोष्टीचा नंतर काही विघ्न संतोषी लोकांनी असा प्रचार केला की मोघ्यांनी गांधी वधाची बातमी ऐकून आनंदाने टाळी वाजवली.
आम्ही बाल स्वयं सेवक असल्याने आमच्या पालकांना तंबी देऊन आमची सुटका झाली होती. पण आमच्या घराची झडती घ्यायला फौजदार आले त्यांना घरात काही सापडले नाही पण आमच्या फळ्यावर महात्माजींचे शेवटचे पत्र खडूने लिहले होते त्यावर तो फौजदार म्हणाला तुम्ही गांधीजींचा अपमान केला आहे,त्या पत्राच्या खाली आपका बापू अशी सही होती, आमच्या वडिलांनी त्यांना शांतपणाने विचारले, तुमच्या म्हणण्याप्रमाणे काय पाहिजे तो म्हणाला आपकी असे पाहिजे वडिलांनी तेथे आपकी असे केले व तो शांत पणे निघून गेला.
प्रा. प्रभाकर आपटे
पुणे